राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट; पुढील 48 तास राहा सतर्क


मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर जवळपास दहा दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पिकांबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र आता हवामान विभागाने पुढील 48 तासांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठवाड्यात मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने या विभागात सुमारे 40 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. त्यामुळे अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असली तरी शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

विदर्भात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत काही ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकणात यलो अलर्ट, समुद्र खवळण्याची शक्यता

कोकणात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे कोकणात ढगाळ वातावरण राहणार असून, ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!