जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम? कुणबी जात प्रमाणपत्रासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय


मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील 62 महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नागरिकांना जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, हा या मोहिमेमागील उद्देश आहे. ही शिबिरे 16 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार असून, यामध्ये संबंधित नोंदींचा शोध घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

जात प्रमाणपत्राशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाने उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तक्रारींचा दररोज आढावा घेणे, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्यात समन्वय साधणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या संदर्भातील तक्रारी किंवा माहितीसाठी प्रशासनाने 9545451005 हा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे.

मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत काही बदल करण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या लाभावर असलेली रकमेची मर्यादा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेचे शुल्क थेट संबंधित यंत्रणेमार्फत संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे.

मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन?

मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात नव्याने पत्र दिले आहे. यापूर्वी आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली होती. आता पुन्हा पत्र देण्यात आले असून, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनासाठी येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

मात्र मुंबईतील आंदोलनाची नेमकी तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नसून, ती नंतर कळवण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!