‘सोन्याच्या पाटल्या, ऑटोसाठी माहेरून पैसे घेऊन ये’; राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या मृत्यूने खळबळ, FIRमध्ये गंभीर आरोप


धाराशिव : राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी त्यांच्या तीन लहान मुलांसह धाराशिवमधील नळदुर्ग किल्ल्यावरून सुमारे 100 फूट खोल दरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या जावयावर आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

मुलींच्या जन्मानंतर अश्विनी यांचा अधिक छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सोन्याच्या पाटल्या आणि ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी करून त्यांना मारहाण तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तानाजी मोहिते यांची मुलगी अश्विनी यांचा विवाह 2020 मध्ये मनोहर अंकुश पौळ यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळाने त्यांना मुलगा झाला. 2021 मध्ये अश्विनी आणि त्यांचा मुलगा अजिंक्य काही काळ माहेरी आले होते. त्यानंतर त्या पुन्हा सासरी गेल्या. 2024 मध्ये त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. मुलींच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोन्याच्या पाटल्या आणि ऑटोसाठी पैशांची मागणी

एफआयआरमधील आरोपानुसार, लग्नाच्या वेळी हुंडा दिला नसल्याचे सांगत अश्विनी यांचा छळ केला जात होता. सोन्याच्या पाटल्या आणि ऑटो रिक्षा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात येत होती. पैसे आणले नाहीत तर मारहाण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

अश्विनी यांनी फोनवरून आपल्याला सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिल्याचे त्यांच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनी एक म्हैसही विकत घेऊन दिली होती. मात्र, त्यानंतरही अश्विनी यांचा छळ सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास वाढत गेल्यानंतर अश्विनी यांनी माहेरच्या व्यक्तींना याबाबत माहिती दिल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!