17 सप्टेंबरला देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ? संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले…

मुंबई : येत्या 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. मात्र, त्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. चार मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं सांगत, ही भाजपच्या अधःपतनाची सुरुवात आहे, असं सूचक विधान राऊत यांनी केलं.
यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपपंतप्रधानपदाची मागणी केल्याचा दावा करत, या पदावर मोदींचा वारस असावा, अशी भूमिका संघाची असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या सर्व घडामोडी बरंच काही सांगून जातात, असंही त्यांनी सूचित केलं.

संजय राऊत सध्या कोल्हापूर दौऱ्यावर होते. ‘दिनमान साहित्य उत्सव पर्व 2’मध्ये झालेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. “तुम्ही वारंवार सप्टेंबरमध्ये मोठं काहीतरी घडणार असल्याचं सांगता, नेमकं काय घडणार?” असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी भाजपमधील कथित अंतर्गत नाराजीवर भाष्य केलं.


‘चार मंत्र्यांचा राजीनामा देण्यास नकार’
सप्टेंबर आला आहे, येऊ द्या. मी 17 सप्टेंबरची तारीख दिली आहे. याच दिवशी मोदींचा वाढदिवस आहे. या क्षणी भाजपमध्ये पहिल्यांदाच बंडाळीचं स्वरूप वाढलं आहे. गेल्या दहा वर्षांत ते दिसलं नव्हतं. पक्षात मोदी आणि शाह यांची दहशत होती, ती आता राहिलेली नाही,” असा दावा राऊत यांनी केला.
मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात. मात्र, चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला. हे चारही मंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचंही राऊत यांनी म्हटलं.
‘भाजपमधील बंड वाढणार’
आम्ही राजीनामा का द्यायचा? आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या. त्यांना वगळून आम्ही राजीनामे का द्यायचे? असा सवाल संबंधित मंत्री करत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपमधील बंडाळी आगामी काळात आणखी वाढेल, असा दावा त्यांनी केला.
‘मोदींच्या पतनाची सुरुवात’
संघाची भूमिका आणि मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा संदर्भ देत राऊत यांनी मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावरही टीका केली. संघाकडून उपपंतप्रधानपदाची मागणी होत असून, या पदावर मोदींचा वारस असावा, असा दावा त्यांनी केला.
हा वारस अमित शाह नसणार, असं म्हणत राऊत यांनी भाजपमधील समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत दिले. मोदींच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण होत असून, मोदींच्या पतनाची सुरुवात सुरू झाली आहे, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, राऊत यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीचाही संदर्भ देत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.