एक ‘धुरंधर’मुळे चर्चेत, दुसरीने गेमच फिरवला; क्रिस्टल डिसूझा अन् रिदा थरानाने जिंकले 66 लाख! ‘द ट्रेटर्स 2’च्या विजेत्या दोघी आहेत तरी कोण?


मुंबई : करण जौहरच्या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले 3 सप्टेंबर रोजी पार पडला. सुरुवातीपासूनच ट्विस्ट, रणनीती आणि विश्वासघाताने रंगलेल्या या सीझनमध्ये अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा आणि रिदा थराना यांनी बाजी मारली. दोघींनी मिळून तब्बल 66 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकत ‘द ट्रेटर्स 2’चं विजेतेपद पटकावलं.

विशेष म्हणजे, फायनलपर्यंत पोहोचलेल्या क्रिस्टल आणि रिदा या दोन्ही ट्रेटर्सनी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकींवर विश्वास कायम ठेवला. क्रिस्टलकडे रिदाला गेममधून बाहेर करून संपूर्ण बक्षीस रक्कम एकटीने जिंकण्याची संधी होती. मात्र, तिने हा डाव न खेळता रिदावर विश्वास दाखवला आणि दोघींनी मिळून विजेतेपदावर नाव कोरलं.

मल्लिका शेरावतला फायनलच्या आधीच केलं बाहेर

संपूर्ण सीझनमध्ये क्रिस्टल आणि रिदाने अत्यंत सावध आणि नियोजनबद्ध पद्धतीने गेम खेळला. एकामागून एक स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवत त्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या.

अंतिम मिशनच्या आधी क्रिस्टल आणि रिदाने मल्लिका शेरावतला गेममधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. मल्लिकाच्या एक्झिटनंतर दलीप ताहिल, शालिनी पासी, साहिल सलाथिया, रिदा थराना आणि क्रिस्टल डिसूजा हे पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले.

फायनल मिशनमधून बक्षीस रक्कम 66 लाखांवर

फायनल मिशनमध्ये स्पर्धकांना उंटांवर ठेवलेल्या बॅगमधून सोन्याच्या विटा शोधून त्या जमा करायच्या होत्या. मिशन सुरू होण्यापूर्वी प्राइज पूलमध्ये 48 लाख 40 हजार रुपये होते. अंतिम टास्कमध्ये स्पर्धकांनी आणखी 17 लाख 60 हजार रुपये जमा केले. त्यामुळे शोच्या अखेरीस एकूण बक्षीस रक्कम 66 लाख रुपयांवर पोहोचली.

क्रिस्टलचा दलीप ताहिलविरोधात मास्टरस्ट्रोक

फायनल मिशननंतर ‘सर्कल ऑफ शक’चा टप्पा सुरू झाला. यावेळी साहिल सलाथिया आणि दलीप ताहिल यांच्यात वाद झाला. दलीप यांच्या काही वक्तव्यांवर शालिनी पासीनेही नाराजी व्यक्त केली.

ही परिस्थिती लक्षात घेत क्रिस्टलने इतर स्पर्धकांना दलीप यांच्या विरोधात मतदान करण्यासाठी तयार केलं. अखेर मतदानात दलीप ताहिल यांना गेममधून बाहेर करण्यात आलं. विशेष म्हणजे, फायनलपर्यंत पोहोचूनही दलीप यांना गेममधील आपली खरी ओळख उघड करण्याची संधी मिळाली नाही.

‘शक’ की ‘ट्रस्ट’? फायनलमध्ये रंगला विश्वासाचा खेळ

दलीप यांच्या एक्झिटनंतर क्रिस्टल, रिदा, शालिनी आणि साहिल हे चार स्पर्धक उरले. विजेता ठरवण्यासाठी त्यांच्यासमोर एक खास गेम ठेवण्यात आला. प्रत्येक स्पर्धकाला ‘शक’ आणि ‘ट्रस्ट’ यापैकी एक पर्याय निवडायचा होता.

जर चौघांनीही ‘ट्रस्ट’ निवडलं असतं तर गेम तिथेच संपला असता. मात्र, एका स्पर्धकाने जरी ‘शक’ निवडलं तर पुढील टप्पा सुरू होऊन मतदानाद्वारे एका खेळाडूला बाहेर केलं जाणार होतं.

पहिल्याच फेरीत चौघांनी ‘शक’ची निवड केली. त्यानंतर झालेल्या मतदानात साहिल सलाथिया यांना गेममधून बाहेर करण्यात आलं.

दुसऱ्या फेरीत क्रिस्टलने बदलला संपूर्ण गेम

फायनलच्या दुसऱ्या फेरीत क्रिस्टलने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. यावेळी तिने ‘शक’ऐवजी ‘ट्रस्ट’ची निवड केली. तिच्यासोबत रिदानेही ‘ट्रस्ट’ निवडल्याने दोघींची रणनीती स्पष्ट झाली.

मात्र, शालिनी पासीने पुन्हा ‘शक’ची निवड केली. त्यामुळे आणखी एक मतदानाचा टप्पा सुरू झाला. शालिनीने रिदाच्या विरोधात मतदान केलं, तर क्रिस्टल आणि रिदा या दोघींनी शालिनीच्या विरोधात मत दिलं.

दोन विरुद्ध एक अशा मतांमुळे शालिनी पासीचा गेम संपला आणि फायनलमध्ये क्रिस्टल आणि रिदा या दोघीच उरल्या.

अखेर दोघींनी एकमेकींवर विश्वास ठेवत ‘द ट्रेटर्स 2’चं विजेतेपद पटकावलं. क्रिस्टलने रिदाला बाहेर करण्याऐवजी तिच्यावर विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे दोघींना मिळून तब्बल 66 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जिंकता आली.

कोण आहे रिदा थराना?

रिदा थरानाने आपल्या करिअरची सुरुवात होस्ट आणि अँकर म्हणून केली. सुरुवातीच्या काळात छोटी-मोठी कामं केल्यानंतर सोशल मीडियावरील कंटेंटमुळे तिची लोकप्रियता वाढली. तिच्या डिजिटल कंटेंटमुळे तिने सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

रिदा मूळची कर्नाटकातील कोडगू येथील असून सध्या बंगळुरूमध्ये कंटेंट क्रिएटर, मॉडेल आणि अँकर म्हणून काम करते. तिचा जन्म कुर्गमधील पोलिबेटा येथे झाला. उच्च शिक्षणासाठी ती बंगळुरूला आली आणि गार्डन सिटी युनिव्हर्सिटीमधून बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्समध्ये पदवी घेतली.

मॉडेलिंग आणि अँकरिंगसोबतच ती कंटेंट क्रिएशनमध्येही सक्रिय आहे. तिने अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे. ‘द ट्रेटर्स 2’मधील तिच्या रणनीतीमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

क्रिस्टल डिसूजाचीही जोरदार चर्चा

क्रिस्टल डिसूजा ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. विविध हिंदी मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच तिच्या डान्समुळेही ती चर्चेत राहिली आहे.

अलीकडेच ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्यातील तिच्या डान्समुळे ती पुन्हा चर्चेत आली होती. आता ‘द ट्रेटर्स 2’चं विजेतेपद पटकावत क्रिस्टलने आपल्या नावावर आणखी एक मोठं यश जमा केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!