’24 कोटी पाण्यात गेले?’ पहिल्याच पुरात पूल कोसळला; PMRDAच्या कामावर संशय, अलंकार कांचन यांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप


उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील हिंगणगाव-खामगाव टेक दरम्यान नदीवर उभारण्यात येत असलेला कोट्यवधी रुपयांचा पूल पहिल्याच मोठ्या पुराच्या पाण्यात अंशतः कोसळल्याने सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील काही स्लॅब आणि पिलर कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शिवसेनेचे युवा नेते अलंकार बाळासाहेब कांचन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा पूल हिंगणगाव, खामगाव टेक आणि आसपासच्या गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा दुवा ठरणार होता. अनेक वर्षांच्या मागणीनंतर या कामाला मंजुरी मिळाली होती. सुमारे 18 ते 24 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या या पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पुरात त्याचा काही भाग कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर शंका निर्माण झाली आहे.

अलंकार कांचन यांनी सांगितले की, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या पुलाला मंजुरी मिळाली होती. PMRDAने हे काम खासगी ठेकेदार कंपनीकडे सोपविले होते. मात्र, पूल पूर्ण होण्यापूर्वीच त्याची अशी अवस्था झाल्याने जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी बांधकाम क्षेत्रातील कथित ‘टक्केवारी’च्या व्यवस्थेवर गंभीर आरोप करत, अधिकाऱ्यांना कमिशन देण्याच्या दबावामुळे अनेक ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात, असा दावा केला. “जनतेच्या कराच्या पैशातून उभारले जाणारे प्रकल्प जर पहिल्याच पुरात कोसळत असतील, तर हा केवळ अपघात नसून व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा परिणाम आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

घटना घडूनही संबंधित विभागातील अधिकारी किंवा ठेकेदार तातडीने घटनास्थळी पोहोचले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, तांत्रिक मानके, कामाची देखरेख आणि निधीच्या वापराची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दोषी ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि कामाच्या देखरेखीतील जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यास त्याचाही तपास करावा, अशी मागणी अलंकार कांचन यांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात PMRDAकडून अधिकृत अहवाल आणि पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!