सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात ९ महिने काय केलं? ९ वेळा स्पेसवॉक अन्…; नासाने दिली आश्चर्यचकित करणारी माहिती…

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिने १३ दिवस अडकून पडलेले ‘नासा’चे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी पहाटे पृथ्वीवर परतले आहेत.भारतीय वेळेनुसार आज (ता.१९) पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. १७ तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
दरम्यान, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे देखील त्यांच्यासोबत होते. हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरले. तिथून नासा आणि स्पेसएक्स टीमने त्यांना बाहेर काढले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे ९ महिने राहिले, त्या काळात त्यांनी तिथे काय केले?, याबाबत नासाने माहिती दिली आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. दोघांचाही हा प्रवास केवळ ८ दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना ९ महिने तिथे थांबावे लागले. या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे.
सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.