कानपूरमध्ये संतापजनक घटना! भावाला बांधून ठेवत ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार…

कानपूर : कानपूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून त्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित कुटुंब मूळचे फतेहपूर येथील असून सध्या ते सचेंडी परिसरात भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. कुटुंबप्रमुख एका कारखान्यात काम करतात. काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते एकट्याने आपल्या दोन मुलगे आणि दोन मुलींचा सांभाळ करत आहेत.
घटनेच्या दिवशी वडील कामावर गेले असताना त्यांचा १० वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होते. त्याच वेळी परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणारा दीपक नावाचा युवक तेथे आला.

घराजवळील चहाच्या टपरीमुळे मुलांना तो आधीपासून ओळखीचा होता. त्याने मुलांना फिरायला नेण्याचे आमिष दाखवले आणि ते त्याच्यासोबत गेले. यानंतर आरोपीने दोन्ही मुलांना किसाननगर पुलाजवळील एका निर्जन ठिकाणी नेले.

तेथे त्याने खेळण्याच्या बहाण्याने 10 वर्षांच्या मुलाचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्याला पुलाजवळ टाकून दिले. त्यानंतर त्याने त्या निरागस मुलीवर अत्याचार केला. मुलगी मदतीसाठी ओरडत होती, मात्र आरोपीने त्याकडे दुर्लक्ष केले. हा संपूर्ण प्रकार तिच्या भावाच्या डोळ्यांसमोर घडत होता.
घटनेनंतर आरोपी दोघांनाही त्या अवस्थेत सोडून पळून गेला. जाताना त्याने धमकी दिली की, जर कुणाला काही सांगितले तर त्यांना ठार मारेल. काही वेळाने मुलाने स्वतःची सुटका करून घेतली आणि दोघेही रडत-रडत घरी पोहोचले. वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांनी ही घटना सांगितली. मुलांच्या अंगावर जखमांचे निशाण पाहून वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीनानाथ मिश्रा यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अत्याचार, अंतर्गत गुन्हा आणि जीवे मारण्याची धमकी अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.