थोरल्या जावेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलेप्रकरणी धाकट्या जावेस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा…

लोणी काळभोर : धाकट्या जावेने चारित्र्यावर संशय घेऊन सातत्याने केलेल्या मानसिक छळाला कंटाळून थोरल्या जावेने आत्महत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने तब्बल औन१५ वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात आरोपी महिलेला ३ वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून उर्वरित सहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.हा निकाल पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी दिला आहे.

मंगल सचिन अडागळे (वय ४०, रा. लोणी काळभोर, सध्या राहू, ता. दौड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर गुलाब गणपत पवार, प्रकाश गुलाब पवार, अनिल गुलाब पवार, रेखा अनिल पवार, कमलाबाई गुलाब पवार व लिला प्रकाश पवार (सर्व रा. राहू, ता. दौंड) यांचेविरोधात सबळ पुरावा न मिळाल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी मयताचे बंधू उमाकांत गुलाबराव शेंडगे (वय ३८, रा. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार त्यांची बहिण मिना सुरेश अडागळे (वय ४०) हिने २०११ साली राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिना यांचा विवाह सुमारे १८ वर्षांपूर्वी झाला होता. त्या पती व दोन मुलांसह लोणी काळभोर येथे राहत होत्या. त्यांच्या दिराचे दुसरे लग्न मंगल हिचेशी झाल्यानंतर दोन महिनेनंतर तिने मिना यांच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार अपशब्द वापरत मानसिक छळ सुरू केला. “तुझे आणि दिराचे संबंध आहेत,” असे आरोप करत तिला बदनाम करण्यात येत होते. तिचे नातेवाईक वारंवार घरी येऊन मिना हिला धमकावणे, अपमान करणे व मानसिक त्रास देत होते. सततच्या या छळामुळे मिना हिचे मानसिक संतुलन ढासळले.

१ सप्टेंबर २०११ रोजी मिनाने आपल्या भावाला फोन करून, “जाऊ माझ्यावर संशय घेत आहे, मला खूप त्रास होत आहे, मला आता जगावेसे वाटत नाही,” असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरला. या पुराव्याच्या आधारे न्यायालयाने मंगल हिला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, सहाय्यक फौजदार विनोद कांबळे, पोलीस हवालदार ललिता कानवडे, अश्विनी पवार व पोलीस अंमलदार अशोक शिंदे यांची मोलाची मदत मिळाली.
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत मिना यांनी आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले होते. “माझ्यावर घेतल्या जाणाऱ्या संशयामुळे मी हे पाऊल उचलत आहे. मी निर्दोष आहे, पण मला सतत अपमानित केले जात आहे. माझ्या मुलांची काळजी घ्या,” असे भावनिक शब्द त्या चिठ्ठीत नमूद असल्याचे समोर आले. तसेच, आपल्या पतीविषयी कोणतीही तक्रार नसल्याचे नमूद करत जाऊ मंगल हिच्या वागणुकीमुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचा उल्लेख तिने केला होता.