शाब्बास वेताळ! वेताळ शेळके ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी, शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरव…

कर्जत : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जतमध्ये सुरु असलेल्या ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत वेताळ शेळके याने बाजी मारली. ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’च्या मान्यतेने कर्जतमध्ये घेण्यात आलेली ६६ वी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि पारदर्शकपणे पार पडली.
या स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळके याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या चांदीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. गेली पन्नास वर्षे कुस्तीसह अन्य खेळांसाठी मोठं योगदान देणारे शरद पवार यांनीही ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम लढतीस हजेरी लावली. तसेच उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यानेही चांगली लढत दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील, विनायकराव पाटील, खासदार. निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते पाटील राजे समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा भरविण्यात आली होती, अतिशय योग्य नियोजन आणि पारदर्शकपणे ही स्पर्धा संपन्न झाली. कुस्ती हा आपला मातीतील खेळ असून तो टिकवला पाहिजे, पैलवानांना, प्रोत्साहन दिले पाहिजे तसेच या खेळात पारदर्शकता पाहिजे, हे सगळं रोहितदादा यांनी अचूकपणे केलं आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
दरम्यान, क्रीडा क्षेत्रात कुस्तीला एक वेगळं महत्व आहे. ते आपल्याला टिकवायच आहे. महाराष्ट्र केसरी ही एक मानाची स्पर्धा असून ती आपली परंपरा आहे. आगामी काळात देखील आपल्याला ती पुढे घेऊन जायची आहे. यावेळी विजयी पैलवानांचा पदके देऊन गौरव केला आणि भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करुन महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्यासाठी शुभेच्छा, असेही रोहित पवार यांनी सांगितले.