Weather Update : राज्यात आजपासून थंडीची लाट! काळजी घेण्याचे आवाहन…

Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशांवर आला असून, पुढील चार दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात शुक्रवारपासून (ता.१३) थंडीची लाट तीव्र होत जाणार असून ती १८ डिसेंबरपर्यंत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान गुरुवारी विदर्भ आणि मराठवाडा गारठण्यास सुरुवात झाली असून विदर्भाचा पारा गुरुवारी १० अंशांखाली गेला होता.
पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत उत्तर भारतात आला आहे. त्यामुळे काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंतचा भाग गुरुवारपासून गारठून गेला. राजस्थानातील सिकर येथे गुरुवारी एक अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. Weather Update

हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले. त्या भागातून राज्यात शीतलहरी येत आहेत. त्याची सुरुवात विदर्भापासून झाली आहे. त्यामुळे १३ ते १८ डिसेंबरपर्यंत किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
गुरुवारचे किमान तापमान पुढील प्रमाणे..
नागपूर 9.8, गोंदिया 9.8, वर्धा 10.5, नाशिक 11.7, अकोला 12.5, अमरावती 11.4, बुलडाणा 13, ब्रह्मपुरी 11.8, धाराशिव 12, छ. संभाजीनगर 12, परभणी 11.5, बीड 11.9, पुणे 13.3, अहिल्यानगर 11.5, जळगाव 10.3, महाबळेश्वर 13.6, मालेगाव 13.6, मुंबई 21.6, कोल्हापूर 18.2, सांगली 17.2, सातारा 15.5, सोलापूर 16.4.
