राज्यात हवामानाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांवर संकट; पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे

पुणे : राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा वाढला असून नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागने महाराष्ट्रासाठी दोन वेगवेगळे यलो अलर्ट जारी केले आहेत.

कोकण आणि विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे, तर मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ दरम्यान अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या बदलत्या हवामानाचा फटका कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा येथे पाहायला मिळाला. सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यांमध्ये गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळमधील मोरे आणि आंबेरी गावांमध्ये तब्बल अर्धा तास गारांचा पाऊस झाला. तसेच चिपळूण शहरातही अचानक हवामान बदलले. काही मिनिटांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

दुसरीकडे, बीड जिल्हा मध्ये उष्णतेचा कडाका कायम असून नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत (२४ आणि २५ एप्रिल) तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

एकाच वेळी उष्णतेची लाट आणि गारपीट-पावसाचा धोका निर्माण झाल्याने राज्यातील जनजीवनावर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.