वडिलांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट; राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विक्रमी विजय

राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भावनिक वातावरणात भाजपचे अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. वडिलांच्या आठवणी आणि सहानुभूतीची लाट यामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात कर्डिले यांच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले.

26 फेऱ्यांच्या मतमोजणीत अक्षय कर्डिले यांनी तब्बल 1,07,485 मतांची आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांना 26,961 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना 5,518 मते मिळाली. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनाही मर्यादित मतांवर समाधान मानावे लागले.
मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून कर्डिले आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांतच त्यांनी हजारोंची आघाडी घेतली आणि पुढे प्रत्येक फेरीत ती वाढवत नेली. दहाव्या फेरीपर्यंत आघाडी 40 हजारांच्या पुढे गेली होती, तर विसाव्या फेरीपर्यंत ती 77 हजारांवर पोहोचली. अखेरीस 26 व्या फेरीत त्यांनी लाखाचा टप्पा पार करत प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळवला.

दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारीत झालेल्या बदलांचा आणि अंतर्गत घडामोडींचाही परिणाम दिसून आला. स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा जोरदार पाठिंबा यामुळे भाजपचा विजय अधिक भक्कम झाला.

राहुरीतील हा निकाल केवळ सहानुभूतीची लाट नसून, मतदारांचा स्पष्ट आणि ठाम कौल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या विजयानंतर भविष्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.