मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न

मणिपूर : मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री इम्फाळ शहरामध्ये सुरक्षा दलाचे जवान व हिंसक जमावामध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले.
जमावाने इंफाळ पॅलेस मैदानाजवळील गोदामाला आग लावली आणि नंतर भाजप नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हिंसक लोकांनी तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशीही झटापट केली.
मणिपूरच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (आरएएफ) जवानांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक त्यांच्याशी भिडले. पोलिसांनी सांगितले की, जमावाने परिसरातील इतर खाजगी मालमत्तांना जाळण्याचा प्रयत्न केल्याने आरएएफच्या जवानांनी जमावाला पांगवण्यासाठी अंधाधुंद गोळ्या देखील झाडल्या.
काही आंदोलकांनी आमदार विश्वजितसिंह यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी जवानांनी त्या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न देखील केला. भाजपच्या कार्यालयाला शनिवारी रात्री जमावाने घेराओ घातला होता पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लष्करी बंदोबस्त होता त्यामुळे ते या ठिकाणी पोहचू शकले नाही.
इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. हजार लोकांच्या जमावाने या शहरातील राजवाड्याजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व रबरी गोळ्यांचा मारा करून जमावाला पांगविले.
आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग
सुमारे दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग लावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता.