अजित पवारांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी; धक्कादायक दाव्यानंतर प्रकरणात मोठा ट्विस्ट…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
आता सरकारने आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापण केली आहे. या एसआयटीमधील सर्व अधिकारी बीड जिल्ह्यातीलच आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातच या घटनेचा तपास होणार आहे. मात्र या तपासावर आता विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे.
असे असताना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. तसेच त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा आरोप बजरंग सोनावणे यांनी केला.
तसेच १२ तारखेला वाल्मीक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची नेत्याच्या कार्यालयात भेट झाली. शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. तसेच सरकारला देखील हालचाल करावी लागली सरकारला असे खून वाचवायचे सवय आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे.
दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या त्यांचा वावर पाहता या प्रकरणात खरोखर न्याय मिळेल का अशी शंका आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच फडणवीस म्हणतात की कोणालाही सोडणार नाही पण फडणवीस आणि कुणाला कधी सोडले आणि कसं अडकवले याची एक एसआयटी नेमली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.