मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने आज (ता.२२) वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
वाल्मिक कराडला बुधवारी (ता. २२) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली.
दरम्यान, याप्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, हे बघावे लागेल. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.
वाल्मिक कराड याने ३१ डिसेंबरला पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्कारली होती. तेव्हापासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात त्याच्या सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. एरवी न्यायालयीन कोठडीतील आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. मात्र, वाल्मिक कराडला मकोका लागल्याने त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.