वाल्मिक कराडने डाव टाकला, तुरुंगातून बाहेर येणार?, कोर्टातून आली महत्वाची माहिती..

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आज दुसरी सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले होते. आज झालेल्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने मोठा डाव टाकला.
वाल्मिक कराडसह महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे यांना या प्रकरणात अटक झाली आहे, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, काही गोपनीय साक्षीदारांच्याही जबाबांची नोंद झाली आहे.
आज कोर्टात वाल्मिक कराडने अर्ज सादर करत सांगितलं की, “माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. खंडणी मागितल्याचा आरोपही सिद्ध झालेला नाही. त्यामुळे मला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं. त्याच्या अर्जावर पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी सरकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे.
सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्जवल निकम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रांची जंत्री मागितली होती, ती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्याने पुन्हा एकदा दोषमुक्ततेची मागणी केली आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे, न्यायालयात संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सादर करण्यात आला आहे. तसेच, वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यासाठी मोक्का कायद्यानुसार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात आरोपींविरोधात अजूनही आरोप निश्चित झालेले नाहीत, अशी माहिती ॲड. निकम यांनी दिली.
या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत आरोप निश्चिती आणि तपास यंत्रणांचे सादरीकरण यावरून या खटल्याला नवे वळण मिळू शकते. आरोपींच्या मुक्ततेबाबतचा निर्णय २४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे.