उरळी कांचन सर्वात मोठे टर्मिनल, तर चार रेल्वे स्टेशनचा विकास, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा…

उरुळी कांचन : पुणे रेल्वे स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात याविषियी अनेक खासदारांनी रेल्वे मंत्र्यांकडे पुणे शहराचा वेगाने होत असलेला विकास लक्षात घेता पुण्यातून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली.
या प्रश्नावर उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील चार रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. तसेच उरुळी कांचन येथे सर्वात मोठे टर्मिनल उभारण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (ता.१९) संसदेच्या अधिवेशनात ही घोषणा केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पुणे हे शैक्षणिक हब बनले आहे. त्यामुळे पुण्यासाठी देशातून गाड्यांची मागणी नेहमी येते. त्यामध्ये जबलपूर, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून पुण्यासाठी रेल्वे गाड्या वाढविण्याची मागणी केली आहे.
पुण्यातून रेल्वे गाड्या वाढवण्यासाठी तेथील रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये चार स्टेशनचा विकास केला जात असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहे.
दरम्यान, हडपसर टर्मिनल, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. उरळी कांचन येथे मोठे टर्मिनल उभे करण्याचे काम सुरू आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर गाडी उतरून ती गाडी देखभाल दुरुस्तीसाठी उरळी येथे जाईल. ती गाडी पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनमार्ग प्रवास करेल. यामुळे स्टेशनच्या विकासात गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.