राज्य हादरवून सोडणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलीस दलातील पोलीसाला अटक; हत्येचा झाला उलगडा..

सांगोला : सांगोला तालुक्यातील वासुद येथे रात्री जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या निलंबित सहायक पोलीस निरीक्षक यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. पोलीस निरीक्षकाचे हत्येचा गुंता सुटला आहे.
सूरज विष्णू चंदनशिवे( वय. ४२ ) असे खून झालेल्या सहाय्यक सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दालात कार्यरत असणाऱ्या सुनील मधुकर केदार याला पोलिसांनी अटक केली आहे. केदार हा देखील वासुद गावचा असून आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी सुरज चंदनशिवे खुन प्रकरणात मुंबई पोलीस दलातील कर्मचारी सुनील केदार आणि त्याच गावातील सहकारी विजय केदार या दोघांना खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्या झालेल्या सुरज चंदनशिवे यांना केदार यांचे काही पैसे द्यायचे होते, यावरुन वाद झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी रात्री जेवण केल्यानंतर सूरज हे आपल्या राहत्या घरापासून थोडं दूर शतपावली करण्यासाठी गेले होते. केदारवाडी रस्त्यावर ते शतपावली करत होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी सूरज यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.
यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शतपावली करुन बराचवेळ झाला तरी सूरज घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी सूरज यांचा मृतदेह वासूद – केदारवाडी रोडजवळ आढळून आला.
याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता. पंधरा दिवसांच्या तपासानंतर सांगोला पोलिसांच्या हाती खूनाचे धागेदोरे लागले आहेत. संशयित आरोपी सुनील केदार याला सांगोला पोलिसांनी आठ दिवसापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतले होते.
चंदनशिवे आणि केदार यांच्यात पैशांचे मोठे व्यवहार होते. या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांना संशय होता. तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सुनील केदार व विजय केदार या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सांगोला पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड करत आहेत.