कुंजीरवाडी कालव्यावरील पूल १२ वर्षे कागदावरच! ३३ लाखांचे काम ८० लाखांवर…


उरुळीकांचन : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची, तरडे तसेच इतर गावांसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा आणि कुंजीरवाडी येथील नव्या उजव्या कालव्यावर उभारला जाणारा महत्त्वाचा पूल गेली अनेक वर्षे प्रत्यक्षात येण्याऐवजी केवळ कागदावरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. २०१४ साली ३३.५२ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या पुलाचा खर्च आज तब्बल ८० लाखांच्या पुढे पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात मात्र काम सुरू झालेले नाही. तीन वेळा निविदा प्रक्रिया पूर्ण आणि सर्व प्रशासकीय मंजुरी असून अद्यापही काम सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष बाब म्हणजे, या कामाचे कंत्राट बाहेरच्या तालुक्यातील ठेकेदाराला मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे, परंतु संबंधित ठेकेदाराकडून आजअखेर कामाला सुरुवात झालेली नाही. संबंधित ठेकेदारावर प्रशासनाचा किती अंकुश आहे हे सध्याच्या परिस्थितीवरून समजत आहे. तसेच संबंधित कंत्राटदार काम का सुरू करत नाही? कोणाच्या परवानगीची वाट पाहिली जात आहे? याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

प्रशासनाने यावर नेहमीप्रमाणे स्पष्टीकरण देत “कालव्याचे पाणी थांबल्यानंतर जून महिन्यात काम सुरू केले जाईल” असे सांगितले जात असले, तरी नागरिकांना हे कारण फारसे पटत नाही. कारण, कोणती कारणे दाखवून ३३ लाखांचा खर्च थेट ८० लाखांवर नेण्यात आला, याचे स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने व वारंवार खर्च का वाढला गेला याची ठोस कारणे न देता आल्याने ग्रामस्थांच्या मनात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याची कबुली काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. “पाणी थांबण्याची वाट पाहताना निधी मात्र का वाहतो?” हा सवाल आता गावागावात चर्चेचा विषय ठरत आहे.

पुलाची सध्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून २०१४ पूर्वीपासून या पुलाची मागणी ग्रामस्थ वेळोवेळी करत आहेत. हा मार्ग केवळ स्थानिक गावांना जोडणारा नसून महामार्गाकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. रोज हजारो नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी या मार्गाने जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक अपघात होऊनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ पासून ते आतापर्यंत मी तसेच माझ्या सोबत माजी उपसरपंच तेजस शिवरकर,शंकर जवळकर,गणेश जवळकर,पारस वाल्हेकर,कैलास खटाटे,तसेच वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थ या कामाचा पाठपुरावा करत आहोत.आज काम सुरू होईल उद्या काम सुरू होईल असे करता करता १२ वर्षे कसे गेले हेच कळले नाही.आतातरी मायबाप प्रशासनाने जागे व्हावे काय बजेट वाढवायचे तेवढे वाढवा,कंत्राट कोणाला द्यायचे त्यांना द्या पण एकदाचे पुलाचे काम करा म्हणजे आमच्या ग्रामस्थांसमोरची मोठी अडचण दूर होईल.

-आबासाहेब जवळकर (माजी सरपंच आळंदी म्हातोबा)

मी या ठिकाणी या पदावर जॉइन झाल्यापासूनची माहिती तुम्हाला देऊ शकतो त्यापूर्वी या कामाचे काय झाले याची मला कल्पना नाही.आज मी माहिती घेतली असता त्यानुसार मे २०२६ पर्यंत पाटाचे आवर्तन असून त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करण्यात येईल.संबंधित कंत्राटदार ते सुरू करेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!