पुणे शहराला २०३० पर्यंत देशाचे आधुनिक शहर म्हणून विकसाला आणणार; पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर व हडपसर – यवत या ३ उन्नत मार्गांचे भूमिपूजन….

पुणे : पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतून शासनाला अनुक्रमे ५००, ३०० आणि १५० कोटी असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असेही ते म्हणाले.
गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर, हडपसर – यवत या ३ उन्नत मार्गांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर व विशेषतः औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांवरील समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळणार आहे. भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा वेध घेत या तिन्ही उन्नत मार्गांवरून पुढील काळात मेट्रो नेण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

या उन्नत मार्गांवरच भविष्यात मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आतापासूनच आवश्यक ती डिझाईन तयार केली आहे. यामुळे भविष्यात जेव्हा मेट्रोचे काम सुरू होईल, तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व या एकत्रित रचनेमुळे मेट्रोच्या खर्चात किमान ४० टक्क्यांची बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्या पुरंदर विमानतळाशी जोडणी (कनेक्टिव्हिटी) वाढविण्यावरही शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिवेघाटामध्ये दुहेरी बोगदा तयार करून त्यातून रस्ता व मेट्रो नेल्यास पुरंदर विमानतळावर पोहोचण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल व विनाअडथळा प्रवास शक्य होईल, यादृष्टीने विचार सुरु आहे. या विमानतळासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले असून, देशाच्या इतिहासात इतक्या वेगाने भूसंपादन होण्याचा हा विक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच १७३ किलोमीटरचा बाह्य व ८६ किलोमीटरचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची गंभीर समस्या दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन उन्नत मार्गांचे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची मोठी अडचण असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उन्नत मार्ग उभारले जात आहेत. या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून, त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य शासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पोलाद आणि सिमेंटवरील राज्य शासनाच्या हिश्श्याचा वस्तू व सेवा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, वाळू, खडी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील स्वामित्व धन माफ करण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रियेलाही शासनाने मोठे सहकार्य केले आहे.
रस्ते आणि पुलांच्या बांधकामात जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मलेशियामध्ये विकसित करण्यात आलेल्या ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट’ या तंत्रज्ञानामुळे पुलांतील दोन खांबांमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. त्यामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच एकाच खांबावर रस्ता, पूल आणि मेट्रो अशी अत्याधुनिक रचना उभारता येणार आहे. पुलांची सुरक्षितता आणि गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी रबरी बेअरिंग्ज व एक्स्पान्शन जॉइंट्सच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या.
नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, भूसंपादन पूर्ण होताच कामाला सुरुवात केली जाईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते पुणे आणि पुढे शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उन्नत मार्ग ‘गेम चेंजर’ – सुनेत्रा पवार
पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुण्याचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला नवी गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे-शिरूर उन्नत मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविध वाहतूक जोडणी या संकल्पनेवर आधारित असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे. हडपसर-यवत मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळेची बचत होईल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क उपलब्ध होऊन मालवाहतुकीला वेग मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगून, भूसंपादनातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्पही लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी सुचना सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यावेळी आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम काकडे, भीमराव तापकीर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील शेळके, बाबाजी काळे, हेमंतजी रासने, शंकरजी मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके , पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
तिन्ही रस्ते प्रकल्पाचे वैशिष्ट्य…
पुणे–शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्या ३१ किलोमीटरमध्ये सहा पदरी उन्नत महामार्ग, तर स्थानिक वाहतुकीसाठी समांतर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. उन्नत महामार्गाच्या सुरुवातीच्या सात किलोमीटर भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी सुमारे दीड ते दोन तासांवरून ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.
हडपसर–यवत महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किलोमीटर असून, त्यामध्ये सुमारे २५ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि सहा पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा मार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोडशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन प्रवास सुलभ व सुरक्षित होईल.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे ५३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत सुमारे २६ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ५३.२ किलोमीटर लांबीचा चार पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.