तुकोबारायांच्या पालखीचे उद्या दोन वाजता पंढरीकडे प्रस्थान


पुणे : आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. राज्याच्या विविध भागातून वारकरी आणि भाविक वाहनांमधून दाखल झालेले आहेत.

उद्या पालखीचा देहूतच मुक्काम असेल. तर, परवा म्हणजेच रविवार (ता. ११) रोजी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

यंदा सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या आणि नेहमी होणाऱ्या गर्दी पेक्षा जास्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिंड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. मुख्य वैकुंठ स्थान मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॉलिश करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांनी सांगितले.

शनिवारी पालखी प्रस्थान सोहळ्यात होणारे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

– पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांच्या हस्ते महापूजा
– पहाटे साडेपाच वाजता : पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात पूजा.
– सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत : देऊळवाड्यातील भजनी मंडपात देहूकर महाराज यांचे पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन
– सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत : इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन

– दुपारी दोन वाजता : देऊळवाड्यातील भजनी मंडपात पालखी प्रस्थान सोहळा मान्यवरांच्या हस्ते प्रस्थान
– सायंकाळी पाच वाजता : पालखीची मुख्य मंदिरात प्रदक्षिणा
– सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदारवाड्यात पहिल्या मुक्कामासाठी मार्गस्थ

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!