संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पहिले अश्वाचे गोल रिंगण, बेलवाडीत डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा…

भवानीनगर : सणसर येथील मुक्कामानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सकाळी सात वाजता सणसर येथून निमगाव केतकी येथील मुक्कामाकडे प्रस्थान केले. त्यावेळी जाचकवस्ती खाराओढा येथून पालखी सोहळा बेलवाडी येथे पोहोचला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाचे लोकं उपस्थित होते.
पालखी सोहळा बेलवाडी येथे आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे सकाळी उत्साहात पार पडले. यावेळी मंत्री दत्तामामा भरणे देखील उपस्थित होते.
आज सकाळी साडेसात वाजता ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात सुरुवातीला नगारखाना नंतर सर्व दिंड्या व पालखी सोहळा रिंगण स्थळामध्ये दाखल झाला. सणसरमध्ये मोठ्या उत्साहात मुक्काम पार पडला. सुरुवातीला अक्षय मचाले यांच्या मेंढ्यांचे रिंगण पार पडले.
नंतर भगव्या पताका घेतलेले वारकरी डोक्यावर हंडा व तुळस घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी व विनेकऱ्यांनी पालखी भोवती प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर पालखीचे मानाचे अश्व व मोहिते पाटलांचे अश्व रिंगणामध्ये दाखल झाले. यावेळी अवघा परिसर भक्तिमय झाला होता.
दरम्यान, पालखी सोहळा रिंगण परिसरात पोहोचल्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे तहसीलदार जीवन कांबळे, नेचर डिलाइट उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जुन देसाई कांतीलाल जामदार छत्रपती कारखान्याचे संचालक शरद जामदार सरपंच मयुरी जामदार केशव नगरे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर विजय पवार तुषार उपस्थित होते