२,००० रुपयांचा पीएम किसान हप्ता धोक्यात! ३० जूननंतर हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात


नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २३व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, त्याआधी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे २,००० रुपये थेट अडकू शकतात. विशेष म्हणजे ३० जून ही यासाठी अंतिम मुदत मानली जात असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना तातडीचे आवाहन केले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. मार्च महिन्यात २२वा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यामुळे नियमानुसार पुढील २३वा हप्ता जुलै २०२६ मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी ई-केवायसी, आधार जोडणी आणि जमीन पडताळणी या प्रक्रिया पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे, त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नावामध्ये तफावत असल्यासही रक्कम जमा होणार नाही. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये अशा तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने सरकारने आधीच आवश्यक दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय शेतजमिनीची नोंद, सातबारा तपशील आणि पीएम किसान पोर्टलवरील माहिती यांची पडताळणी करणेही आवश्यक आहे. बँक खाते आधारशी जोडलेले असणे आणि थेट लाभ हस्तांतरण सुविधा सक्रिय असणे बंधनकारक आहे. या अटी पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांचे नाव यादीतून तात्पुरते वगळले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील आकडेवारीने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८ हजार ७७ लाभार्थ्यांपैकी ३ लाख ५ हजार ९७५ शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असली तरी तब्बल २ हजार १०२ शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना ३० जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तातडीने ई-केवायसी, आधार जोडणी, कागदपत्रांची पडताळणी आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा जुलैमध्ये जमा होणारा पीएम किसानचा २३वा हप्ता हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!