‘विषारी दूध’ रॅकेटचा राज्यभर पर्दाफाश! तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई; १३ जण अटकेत, आणखी दोन टोळ्या रडारवर


मुंबई : महाराष्ट्रातील कृत्रिम व रासायनिक पद्धतीने तयार केलेल्या दूध पुरवठ्याच्या राज्यव्यापी रॅकेटचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक मोहिमेत आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातील दूध भेसळ प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या कारवाईसाठी एफडीएने जवळपास महिनाभर गुप्त माहिती गोळा करून संपूर्ण रॅकेटवर पाळत ठेवली होती. माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ४ आणि ५ जुलैच्या मध्यरात्री संयुक्त छापेमारी करण्यात आली. तपासात मंचर येथील सुशांत हिंगे हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यासह संदीप लोढा यालाही अटक करण्यात आली आहे. दोघेही या गैरव्यवहाराचे प्रमुख भागीदार असल्याचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत.

प्राथमिक तपासानुसार हे जाळे पुणे, सोलापूर, जालना, ठाणे, जळगाव आणि धाराशिव जिल्ह्यांपर्यंत पसरले होते. कृत्रिम दूध तयार करून ते संकलन केंद्रांच्या माध्यमातून विविध डेअऱ्यांमध्ये पोहोचवले जात होते. या साखळीत काही शेतकरी, दूध संकलन चालक आणि किराणा दुकानदारांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रसायने, दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

आरोपींकडे आवश्यक परवाने नसल्याचेही तपासात उघड झाले आहे. याशिवाय अशाच प्रकारे कार्यरत असलेल्या आणखी दोन टोळ्यांची माहिती तपास यंत्रणेला मिळाली असून त्यांच्याविरोधातही चौकशी सुरू आहे. पुरावे मिळाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्याचाही विचार सुरू असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. “या रॅकेटमधील शेवटच्या आरोपीपर्यंत कारवाई होणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!