‘सोलापूरहून पार्सल आलंय…’; उमेश पाटलांचं नाव घेत विक्रम काकडे संतापले, पार्थ पवारांना सावध करण्याचा इशारा?


मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे. मावळमधील पक्षाच्या मेळाव्यात आमदार विक्रम काकडे यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आपल्याला पैसे देऊन आमदारकी मिळाल्याची चर्चा केली जात असल्याचा दावा करत काकडे यांनी उमेश पाटील यांना थेट इशारा दिला. ‘माझ्या नादाला लागू नका’, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली.

आमदार सुनील शेळके यांच्या वतीने मावळमध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना काकडे यांनी आपल्याबाबत सुरू असलेल्या चर्चेचा समाचार घेतला. ‘सोलापूरहून एक पार्सल आलं आहे, उमेश पाटील नावाचं’, असा टोला त्यांनी लगावला. पैसे देऊन आमदार झाल्याचं बोललं जात असल्याचा आरोप करत अशा प्रकारची चर्चा वारंवार सुरू राहिली तर असत्य गोष्टही कालांतराने खरी वाटू लागते, असं ते म्हणाले.

आपल्याला पवार कुटुंबाला पैसे देऊन आमदारकी मिळाल्याचं सांगितलं जात असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं काकडे यांनी स्पष्ट केलं. पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा व्यक्ती महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही, असा पलटवार त्यांनी केला. त्यानंतर ‘असल्या गोष्टी बंद करा’, असं म्हणत त्यांनी उमेश पाटील यांना सुनावलं.

विशेष म्हणजे, पार्थ पवारांचा उल्लेख करत काकडे यांनी उमेश पाटील यांना आणखी एक इशारा दिला. ‘पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा’, असं ते म्हणाले. पार्थ पवार हे आपले लहानपणापासूनचे मित्र असल्याचं सांगत पवार कुटुंबासोबतचे आपले संबंध जुने असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्षातीलच व्यक्ती आपल्याबाबत अशा चर्चा करत असल्याने आपल्याला वाईट वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

विक्रम काकडे यांनी आपल्या भूमिकेवर अधिक स्पष्टपणे भाष्य करताना, आपण अशा पद्धतीने बोलणारी व्यक्ती नसल्याचं सांगितलं. मात्र, एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी गोष्ट सतत बोलली गेली तर लोकांना ती खरी वाटू लागते, असं काही ज्येष्ठांकडून सांगण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे आता आपण हा विषय स्पष्टपणे मांडत असल्याचं काकडे म्हणाले.

या मेळाव्यात काकडे यांनी सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिपदाचाही उल्लेख केला. सुनेत्रा पवार यांनी मंत्रिपद कुटुंबासाठी नव्हे, तर पक्षातील कार्यकर्त्यांसाठी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला मदत केली असून, आता कार्यकर्त्यांनीही त्यांच्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ असल्याचं ते म्हणाले.

सुनील शेळके यांच्या निवडणुकीचा संदर्भ देत काकडे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचं सांगितलं. त्या गर्दीची देशभर चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी केला. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दुःखातून सावरून पक्षासाठी काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

विधान परिषदेच्या निवडणुकांवर बोलताना काकडे यांनी या जागा बिनविरोध झाल्याचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीला दिलं. पुण्याच्या जागेबाबत शरद पवारांचे आभार मानत, त्यांच्या भूमिकेमुळे ही जागा बिनविरोध झाल्याचंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, एका बाजूला सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीतील नेत्यांमधील हे शाब्दिक युद्ध चर्चेत आलं आहे. विक्रम काकडेंच्या थेट इशाऱ्यानंतर उमेश पाटील यांच्याकडून काय उत्तर येतं आणि पार्थ पवार या वादावर काही भूमिका घेतात का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!