ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच ७० हून अधिक व्हिडीओ काढले; महिलेने नकार देताच सुरू झाला धमकीचा खेळ, पुढे पतीला जे पाठवलं ते पाहून धक्काच!

ठाणे : डोंबिवलीतील शिरढोण परिसरात मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर विवाहित महिलेचा कथित छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने महिलेचे तब्बल ७० हून अधिक व्हिडीओ काढल्याचा आरोप असून, तिने पुढे संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर या व्हिडीओंच्या आधारे तिला धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कुणाल शिंगाडे याला अटक केली आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, कुणाल शिंगाडे याची विवाहित महिलेशी मैत्री होती. या ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर महिलेचे ७० हून अधिक व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आहे. मात्र, काही काळाने महिलेने त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने कथितपणे हे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली.

धमकीचा प्रकार इथेच थांबला नाही. आरोपीने महिलेच्या पतीला तिचे फोटो पाठवल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.


तक्रार मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी कुणाल शिंगाडेविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडे असलेले कथित व्हिडीओ आणि फोटो, त्यांचा वापर कशा पद्धतीने करण्यात आला, तसेच समाजमाध्यमांवर ते प्रसारित करण्यात आले आहेत का, याबाबतही तपास केला जात आहे.
दरम्यान, धुळ्यातील २७ वर्षीय विवाहित महिलेवरील कथित सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर सकल चर्मकार समाजाने कठोर कारवाईची मागणी केली आहे. नटराज सिनेमा परिसरातील रामदेवबाबा नगर, चर्मकार वाडा येथील या प्रकरणात आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पीडितेला सुरक्षा आणि विशेष न्यायालयाची मागणी
आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत सकल चर्मकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करून खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. दाखल गुन्ह्यातील सर्व कलमांचा सखोल तपास करून आरोपींना कायदेशीर सवलत मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच या प्रकरणासाठी सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण सुरक्षा द्यावी, तसेच आवश्यक कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल आणि सकल चर्मकार समाजाने केली आहे.
