शिरूर; मालकाच्या हत्येची सुपारी, पण निशाण्यावर आला कामगार; LCB-रांजणगाव पोलिसांनी कटाचा लावला छडा


शिरूर : कारेगाव येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्या हत्येचा स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाण्याच्या प्लॅन्टच्या मालकाला संपवण्यासाठी रचलेल्या कटात मारेकऱ्यांनी मालकाऐवजी त्यांच्याच कामगाराची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

हामजा उस्मान शेख हे कारेगाव येथील ‘समु इंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करत होते. २९ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर रांजणगाव पोलिस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.

घटनास्थळ तसेच परिसरातील ये-जा करण्याच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सार्थक संदेश कोहकडे (२४), तुषार अजय तोडकर (२६), संतोष मधुकर मांजरे (३७), विठ्ठल नवनाथ पिकळे (२७) आणि योगेश विलास इडोळे (२८) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत या हत्येमागील कटाचा उलगडा झाला. पोलिस तपासानुसार, सार्थक कोहकडे याचा विकास नवले यांच्यासोबत जागेवरून वाद होता. या वादातून विकास नवले यांचा खून करण्यासाठी सार्थकने तुषार तोडकर याला सुपारी दिली.

त्यानंतर तुषारने संतोष मांजरे याच्याशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले. पुढे आणखी काही जणांच्या मदतीने विकास नवले यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, या कटात मारेकऱ्यांकडून मोठी चूक झाली. विकास नवले यांच्याऐवजी त्यांच्याच पाण्याच्या प्लॅन्टवर काम करणाऱ्या हामजा शेख यांची हत्या झाली. या प्रकरणातील पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव हे दोघे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या कारवाईत पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!