पोहायला गेला अन् परतलाच नाही! कोरेगाव मूळ येथे स्विमिंग पूलमध्ये पोहताना 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू


उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ‘स्वामी समर्थ स्विमिंग टँक’मध्ये जलतरण तलावात (स्विमिंग पूल) पोहण्यासाठी गेलेल्या एका 13 वर्षांच्या निष्पाप बालकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बुधवारी (ता.10) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यश महेश गायकवाड (वय 13 वर्षे 4 महिने, रा. हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे या मृत बालकाचे नाव आहे. याबाबत मयत मुलाचे वडील महेश तुकाराम गायकवाड, (वय-41, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. हिंगणगाव ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील खाजगी नोकरी करणारे महेश गायकवाड हे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा यश याला पोहता यावे आणि त्याचा सराव व्हावा म्हणून कोरेगाव मूळ येथील स्वामी समर्थ स्विमिंग टँकवर स्वतः सोबत घेऊन आले होते.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महेश गायकवाड हे आपला मुलगा कसा पोहतोय, हे कौतुकाने पाहण्यासाठी स्विमिंग पूलच्या कडेला गेले. त्यावेळी यश पाण्यात आनंदात पोहत होता. त्यानंतर साधारण 10 मिनिटांनी वडील पुन्हा यशला पाहण्यासाठी गेले असता, त्यांना यश पाण्यात कुठेच दिसला नाही.

आपला मुलगा पाण्यात दिसत नसल्याने घाबरलेल्या वडिलांनी तातडीने तिथल्या स्विमिंग कोचला (प्रशिक्षक) गाठले आणि “माझा मुलगा कुठे आहे? तो स्विमींग टँकमध्ये दिसत नाही,” अशी विचारणा केली. त्यावर तिथल्या कोचने सांगितले कि “तो बाथरूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी गेला असेल,” वडिलांनी तात्काळ बाथरूम, चेंजिंग रूम आणि स्विमिंग पूलचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र यश कुठेही मिळून आला नाही.

वडिलांनी पुन्हा धावत जाऊन कोचला मुलगा सापडत नसल्याचे सांगितले. अखेर तिथेच पोहणाऱ्या एका दुसऱ्या मुलाने संशय आल्याने पाण्याच्या तळाशी जाऊन पाहिले, तेव्हा यश हा पाण्याच्या तळाशी निपचित पडलेला दिसला. त्या मुलाने यशला तातडीने पाण्याचा बाहेर काढले. त्यानंतर तिथे हजर असलेले कोच, स्विमिंग पूलचे मालक आणि स्वतः वडिलांनी यशच्या पोटातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रथमोपचार केले.

दरम्यान, त्यानंतर एका चारचाकी गाडीतून त्याला तातडीने उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी यशला तपासून ‘उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे’ घोषित केले. मृत बालकाचे वडील महेश गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मयत’ अशी नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार सस्ते करीत आहेत.

उन्हाळ्याच्या आणि सुट्ट्यांच्या दिवसांत अशा स्विमिंग पूलवर मुलांची मोठी गर्दी असते. मात्र, स्वामी समर्थ स्विमिंग पूलवर एवढी मोठी दुर्घटना घडत असताना तिथले लाइफगार्ड आणि कोच काय करत होते? त्यांनी वेळेवर लक्ष का दिले नाही? असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. उरुळी कांचन पोलीस या प्रकरणी स्विमिंग पूल प्रशासनाच्या हलगर्जीपणाची कडक चौकशी करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!