पहिल्या बायकोला खूश ठेवण्यासाठी दुसरीला बनवलं बहीण, दुसऱ्याशी लावलं लग्न; एका चॅटमुळे फुटलं बिंग, नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात, मात्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे उघडकीस आलेल्या एका प्रकरणाने पोलिसांनाही धक्का बसला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला अनाथ आणि मानलेली बहीण असल्याचे भासवत तिचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

झाशी रोड पोलिसांनी लग्नाच्या आमिषाने फसवणूक करून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय ऊर्फ सोनू चौहान याने स्वतःची दुसरी पत्नी राधा ऊर्फ दीक्षा हिला बहीण असल्याचे सांगून जबलपूर येथील रतन शर्मा यांच्याशी तिचा विवाह लावून दिला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रतन शर्मा यांना एप्रिल महिन्यात हे स्थळ दाखवण्यात आले. मुलगी गरीब, अनाथ आणि कुटुंबाचा आधार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर साखरपुडा आणि लग्न पार पडले. लग्न, दागिने आणि इतर खर्चाच्या नावाखाली पीडित कुटुंबाकडून सुमारे 6.5 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे.

मात्र लग्नानंतर नववधूच्या संशयास्पद हालचालींमुळे कुटुंबाला संशय आला. तिच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट तपासल्यानंतर मोठा धक्कादायक खुलासा झाला. ज्याला ती भाऊ म्हणत होती, तो प्रत्यक्षात तिचा पती असल्याचे समोर आले. दोघांनी 2024 मध्ये प्रेमविवाह केला होता आणि ते एकत्र राहत होते.

पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजय चौहानचे यापूर्वीच लग्न झाले असून त्याला पहिल्या पत्नीपासून मुले आहेत. दुसऱ्या पत्नीचा वापर करून फसवणुकीचा डाव रचण्यात आला होता. लग्नानंतर काही काळाने पीडित कुटुंबाला खोट्या हुंडाबळी आणि कौटुंबिक अत्याचाराच्या प्रकरणांत अडकवून मोठी रक्कम उकळण्याचा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अजय चौहान आणि त्याची पत्नी राधा ऊर्फ दीक्षा यांना ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!