‘फक्त बोला, तक्रार AI लिहिणार!’ तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; FDAचे स्मार्ट पोर्टल सुरू, भेसळयुक्त अन्न-औषधांविरोधात कारवाईला वेग


मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात तक्रार नोंदवणे आता अधिक सोपे आणि तंत्रज्ञानाधारित झाले आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू करण्यात आले असून, नागरिकांना आता मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत केवळ बोलून तक्रार नोंदवता येणार आहे.

ग्राहकांना अनेकदा तक्रार कशी लिहावी, कोणती माहिती द्यावी किंवा कोणत्या स्वरूपात अर्ज करावा, याबाबत अडचणी येत होत्या. मात्र नव्या AI प्रणालीमुळे नागरिकांनी आपली समस्या बोलून सांगितल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता स्वतः त्या माहितीचे व्यवस्थित, स्पष्ट आणि मुद्देसूद तक्रारीत रूपांतर करणार आहे. त्यामुळे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ होणार आहे.

या पोर्टलवर अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी नोंदवता येतील. भेसळयुक्त अन्न, बनावट औषधे, निकृष्ट दर्जाची औषधे किंवा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही नियमभंगाबाबत नागरिक थेट तक्रार दाखल करू शकतात. तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवली जाईल. कारवाईला विलंब झाल्यास प्रणालीकडून स्वयंचलित एस्कलेशनची सुविधाही देण्यात आली आहे.

याशिवाय, तक्रारदाराला तक्रार दाखल केल्यानंतर तिची सद्यस्थिती ऑनलाइन ट्रॅक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

FDAच्या मते, नागरिकांचा सहभाग, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशासनाची जबाबदारी यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. प्रत्येक तक्रारीला गांभीर्याने हाताळून भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधातील कारवाई अधिक वेगाने करण्याचे उद्दिष्ट या पोर्टलमागे आहे.

नागरिक complaints.mahafda.in या पोर्टलवर जाऊन काही मिनिटांत तक्रार नोंदवू शकतात. प्रशासनाने नागरिकांना जागरूक राहून संशयास्पद अन्नपदार्थ किंवा औषधांबाबत त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम राज्यातील ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!