अभिनेत्री प्राप्ती रेडकरला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याची हिंमत..मालाड स्थानकावरच तरुणाची कॉलर पकडली, नेमकं काय घडलं?


मुंबई : गर्दीच्या रेल्वे स्थानकावर एका तरुणाने केलेली कृती आणि त्यानंतर मराठी अभिनेत्रीने घेतलेली भूमिका चर्चेत आली आहे. अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने मालाड रेल्वे स्थानकावर स्वतःसोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. एका तरुणाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करत तिने त्याला थेट विरोध केला. इतकंच नाही, तर त्याची कॉलर पकडून जाब विचारला. त्यानंतर संबंधित तरुणाने माफी मागितली आणि तेथून पळ काढला, असं प्राप्तीने सांगितलं.

प्राप्ती रेडकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्ती आणि महिलांच्या स्वसंरक्षणाचा विषय मांडताना तिने हा अनुभव सांगितला. तिच्या या वक्तव्यामुळे महिलांनी संकटाच्या प्रसंगी कशा प्रकारे स्वतःसाठी उभे राहावे, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मालाड स्थानकावर तरुणाने पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न केला अन्…

प्राप्तीने सांगितल्यानुसार, एकदा मालाड रेल्वे स्थानकावर असताना एका तरुणाने तिला मुद्दाम चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. सुरुवातीला तो नेमका कोण होता, हे तिच्या लक्षात आले नाही. मात्र, काही वेळाने तोच तरुण पुन्हा त्याच हेतूने तिच्या दिशेने येताना दिसला. यावेळी प्राप्तीने त्याची कॉलर पकडली आणि त्याला जोरदार विरोध केला. तिचा विरोध पाहून तो माफी मागू लागला आणि तेथून पळून गेला.

या घटनेने आपल्याला स्वतःमधील स्त्रीशक्तीची जाणीव करून दिली, असे प्राप्तीने सांगितले. प्रत्येक मुलीला आणि महिलेला स्वतःचे संरक्षण करता येणे आवश्यक असल्याचेही तिने स्पष्ट केले.

२०२२ पासून मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण

प्राप्ती २०२२ पासून मार्शल आर्ट्स शिकत आहे. या प्रशिक्षणामुळे तिचा आत्मविश्वास वाढल्याचे तिने सांगितले. संकटाच्या वेळी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महिलांना आवश्यक कौशल्ये आणि माहिती असणे गरजेचे आहे, असे तिचे मत आहे.

‘स्वतःच्या आयुष्याची नायिका बना’; महिलांना खास आवाहन

नवरात्रीच्या निमित्ताने प्राप्तीने प्रत्येक महिला आणि मुलीला स्वतःची काळजी घेण्याचा, चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा आणि संकटात खचून न जाण्याचा संदेश दिला. आपल्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. आपल्याला हवे तसे जगा आणि स्वतःच्या आयुष्याची नायिका बना, असे आवाहन तिने केले.

आजच्या काळात कोणत्या परिस्थितीला कधी सामोरे जावे लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वसंरक्षणाबाबत जागरूक राहून गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे प्राप्तीने अधोरेखित केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!