कुरकुंभ एमआयडीसीत स्फोटाचा थरार! कंपनीत धुराचे लोट उठले, पण अग्निशमन दलाला साधा फोनही नाही; सुरक्षा यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्न

पांढरेवाडी : कंपनीत अचानक भीषण स्फोट होतो, सीसीटीव्हीत धुराचे लोट स्पष्ट दिसतात; मात्र ना अग्निशमन केंद्राला माहिती मिळते, ना औद्योगिक सुरक्षा विभागाला घटनेची कल्पना असते! दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत घडलेल्या घटनेने औद्योगिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) झालेल्या या स्फोटाचे दृश्य समोर आल्यानंतर कंपनीच्या सुरक्षेपासून आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्फोटानंतर कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत किती नुकसान झाले, कोणाला दुखापत झाली का, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सुरक्षा विभाग म्हणतो, आम्हाला कळवलेच नाही!

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक अंकुश खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिमूर्ती फार्मा कंपनीकडून स्फोटाबाबत विभागाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करतील. स्फोट कशामुळे झाला आणि त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, याची माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अग्निशमन केंद्रालाही फोन गेला नाही!
या घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे कुरकुंभ एमआयडीसी अग्निशमन केंद्रालाही स्फोटाची माहिती देण्यासाठी कोणताही कॉल आला नव्हता. अग्निशमन अधिकारी किरण पाटील यांनी ही बाब स्पष्ट केली. औद्योगिक वसाहतीतील कोणत्याही कंपनीत आग किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशमन केंद्राला तातडीने कळवणे आवश्यक असते. माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून मदत करते, असे त्यांनी सांगितले.
स्फोट झाला, पण माहिती कुणी दडवली का?
कुरकुंभ एमआयडीसीमध्ये यापूर्वीही औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता त्रिमूर्ती फार्मातील घटनेनंतर कंपनीत सुरक्षा नियमांचे पालन होत होते का, स्फोटानंतर संबंधित विभागांना माहिती का देण्यात आली नाही आणि आपत्कालीन यंत्रणेला कळवण्याची जबाबदारी कोणी पार पाडली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्फोटाचे नेमके कारण, संभाव्य नुकसान आणि सुरक्षेतील त्रुटी याबाबत अधिकृत तपासणीनंतरच स्पष्टता येणार आहे. मात्र, सीसीटीव्हीत स्फोटानंतरचे दृश्य दिसत असताना संबंधित यंत्रणांना माहितीच नसल्याची बाब औद्योगिक सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
