पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पीक नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याची अपेक्षा ….


पुणे : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. रविवारपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर शासनाकडे मदतीसाठी निधीची मागणी करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेल्या सुमारे १५ दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात महसूल विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकांमार्फत काम सुरू आहे. आज सकाळी झालेल्या आढाव्यानुसार, जिल्ह्यातील बहुतांश पंचनामे पूर्ण झाले आहेत. नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमध्येही प्रशासनाने आधीपासूनच पंचनाम्यांचे काम सुरू केले होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतही सुमारे ६० ते ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

*उपलब्ध पाणीसाठ्याचे दीर्घकालीन नियोजन*
दुष्काळी परिस्थितीबरोबरच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांचा संदर्भ देत, डिसेंबरपासून अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी वर्षातील मान्सूनला विलंब होण्याची परिस्थिती उद्भवू शकते.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पावसाची कमतरता राहिली, तरी नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करता यावा, या दृष्टीने पाण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी म्हणाले.

पाण्याच्या वापरात सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार असून, त्यानंतर शेती आणि इतर गरजांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन अपेक्षित आहे. पीक नुकसानीच्या पंचनाम्यांची पूर्तता, शासनाकडे निधीची मागणी आणि उपलब्ध जलसाठ्याचे दीर्घकालीन व्यवस्थापन या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!