भरधाव कारचा वारकऱ्यावर कहर! बारामतीत पंढरपूर वारीदरम्यान ६७ वर्षीय भाविकाचा मृत्यू; चालक अपघातानंतर फरार

बारामती : आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जेजुरीजवळील दिंडीत ट्रक घुसून तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची धग अद्याप कायम असतानाच, पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. मध्यरात्री भरधाव वेगाने आलेल्या कारने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव विष्णू रामचंद्र पवार (वय ६७) असे असून ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर वारीत सहभागी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास ते इतर वारकऱ्यांसह वारी मार्गाने पुढे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.
घटनेनंतर कारचालकाने मदतीसाठी न थांबता वाहनासह पलायन केले. अपघात पाहताच परिसरातील नागरिक आणि वारकऱ्यांनी तत्काळ धाव घेत जखमी विष्णू पवार यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार कारचालकाचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. संबंधित वाहनाचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग आणि चालकाची ओळख याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत वारी मार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी जेजुरीजवळील दिंडीत ट्रक घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर आता बारामतीतील या अपघाताने वारी मार्गावर वाहतूक नियंत्रण, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि वारकऱ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्थेची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तत्काळ प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वारकरी आणि नागरिकांकडून होत आहे.