बाहेरून दिसायची आलिशान इमारत; आत सुरू होता वेगळाच कारभार; पोलिसांचा अचानक छापा, ३ महिला अन् उघड झाला धक्कादायक प्रकार


पुणे : बाणेर–पाषाण लिंक रोडवरील एका नामांकित व्यावसायिक इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर देहव्यापार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाणेर पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली असून, स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरातील ‘द कॅपिटल’ इमारतीमध्ये ‘ग्रीनलिफ स्पा’ नावाने स्पा सेंटर सुरू होते. मात्र, येथे मसाजच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून बेकायदेशीर देहव्यापार करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे बाणेर पोलिसांनी सापळा रचून स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान तीन महिलांची सुटका करण्यात आली. प्राथमिक तपासात स्पा सेंटरमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले.

या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक (मॅनेजर) आणि जागा भाड्याने देणारा जागामालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

बाणेर–पाषाणसारख्या उच्चभ्रू परिसरातील नामांकित इमारतीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!