रक्षाबंधनासाठी जात असताना काळाची झडप; पुणे-पानशेत रस्त्यावर कारचा टायर फुटला अन्…
पुणे : रक्षाबंधानाच्या दिवशीच पुण्यातील एका कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना बुधवारी (ता.३०) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. या अपघातात १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चौघांचे प्राण वाचले.
संस्कृती सोमनाथ पवार (वय १२, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) हिचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. वेल्हे पोलिसांनी या घटनेत आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नांदेड सिटी येथे राहणारे सोमनाथ पवार हे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांसह कारने पानशेत या आपल्या मुळ गावी जात होते.
कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ अचानक पवार यांच्या कारचे उजव्या बाजूचे टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.
गाडी जोरात धरणात कोसळल्याने आवाज ऐकून आजूबाजूला असलेले स्थानिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यानंतर कारमध्ये असलेल्या चार ते पाच लोकांना त्यांना बाहेर काढले.
पण बारा वर्षांची संस्कृती कारमध्येच अडकली होती. कार पाण्यात बुडाल्याने तिला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रात्री उशिरा कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये संस्कृतीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.