बॉयफ्रेंडने रस्त्यात अडवलं, कोयत्याने सपासप वार; ३ महिने मृत्यूशी झुंज अन् अखेर महसूल सहाय्यक स्नेहल सावंत यांचा दुर्दैवी अंत!


पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षीय स्नेहल सावंत यांच्या मृत्यूने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १३ जून रोजी कामावरून घरी परतत असताना पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल सावंत यांच्यावर त्यांचा प्रियकर अमोल मुळे याने हल्ला केल्याचा आरोप आहे. स्नेहल कामावरून घरी जात असताना अमोलने त्यांना रस्त्यात गाठले. त्यानंतर धारदार कोयत्याने त्यांच्या मानेसह शरीराच्या विविध भागांवर वार करण्यात आले. या थरारक हल्ल्याची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. घटनेनंतर स्नेहल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.

हल्ल्यानंतर त्यांना तातडीने बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाही तीन महिन्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.

दरम्यान, हल्ल्यानंतर अमोल मुळे फरार झाला होता. पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

स्नेहल सावंत यांच्या निधनाची बातमी समोर येताच पालघरमध्ये शोककळा पसरली. तरुण महिला कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू नागरिकांच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि स्नेहल यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!