लग्नाचं स्वप्न दाखवून ६.२५ लाखांचा गंडा! चार दिवस पोलिसांना गुंगारा, अखेर डिलिव्हरी बॉय बनून लॉजमध्ये घुसले अन्…

नवी मुंबई : लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या महिलेला विश्वासात घेऊन लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ओळख वाढवून तब्बल ६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप नागेश अर्जुन पवार याच्यावर आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांना चकवा देत चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता. अखेर तांत्रिक तपासातून त्याचा ठावठिकाणा समोर आला. मात्र, आरोपीला पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून पोलिसांनी थेट डिलिव्हरी बॉयचा वेश धारण केला. त्यानंतर मीरा-भाईंदरमधील लॉजमध्ये लपलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.
विवाहाच्या संकेतस्थळावरून साधला संपर्क

पीडित महिलेने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या विवाहविषयक संकेतस्थळावर लग्नासाठी जोडीदार मिळावा, या उद्देशाने जाहिरात दिली होती. याच जाहिरातीच्या माध्यमातून नागेश पवार याने तिच्याशी संपर्क साधला. संवाद वाढत गेल्यानंतर त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणं सांगून तिच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली.


आधी ६५ हजार रुपये, त्यानंतर लाखोंची फसवणूक
२४ सप्टेंबर रोजी आरोपीने आपल्या गाडीमध्ये बिघाड झाल्याचं सांगत तातडीने पैशांची गरज असल्याचं महिलेला सांगितलं. सुरुवातीला त्याने ६५ हजार रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणं पुढे करून तिच्याकडून आणखी पैसे घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय महिलेच्या बँक खात्याचं विवरण, ओटीपी आणि अन्य महत्त्वाची माहिती मिळवून खात्यातील रकमेचाही गैरवापर केल्याचं तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारात महिलेची एकूण ६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं.
लग्नाबाबत टाळाटाळ, महिलेला फसवणुकीचा संशय
दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने आणि लग्नाच्या विषयावर आरोपी टाळाटाळ करू लागल्याने महिलेच्या मनात संशय निर्माण झाला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने वाशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
चार दिवस लपला, पोलिसांनी बदलला वेश!
तांत्रिक तपासादरम्यान आरोपी मीरा रोड-भाईंदर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो एका लॉजमध्ये लपल्याचं समजल्यानंतर पोलिसांचं पथक तिथे पोहोचलं. मात्र, थेट छापा टाकल्यास आरोपी सावध होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळीच युक्ती आखली. डिलिव्हरी बॉयचा वेश धारण करून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघांचीही चौकशी सुरू आहे. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी या कारवाईची माहिती दिली. ऑनलाइन विवाहविषयक संकेतस्थळांवर ओळख झालेल्या व्यक्तीला आर्थिक मदत करताना किंवा बँकेची गोपनीय माहिती देताना सावध राहण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.
