एका दुकानातील शोरमामुळे भिवंडीत खळबळ! आधी एकाच कुटुंबातील सदस्य रुग्णालयात, नंतर बाधितांचा आकडा १७ वर; महिला आणि चिमुकल्यांचाही समावेश


ठाणे : भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर अचानक नागरिकांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील एका दुकानातून शोरमा खाल्लेल्या १७ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उलट्या, जुलाब, मळमळ, ताप आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने या सर्वांना भिवंडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची सुरुवात एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना त्रास झाल्यानंतर झाली. त्यांनी वंजारपट्टी परिसरातील एका दुकानातून शोरमा खाल्ला होता. त्यानंतर रात्रीपासून त्यांना उलट्या, जुलाब, ताप आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी त्याच दुकानातून इतर नागरिकांनीही शोरमा खाल्ल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर एकामागून एक बाधित रुग्ण रुग्णालयात येऊ लागले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनाही कळवण्यात आले.

महिला आणि चिमुकल्यांची संख्या अधिक; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत माहिती

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला १२ ते १३ रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यामध्ये चार ते पाच महिला, पाच ते सहा लहान मुले आणि दोन पुरुषांचा समावेश होता. पुढे बाधितांची एकूण संख्या १७ असल्याची माहिती समोर आली. सर्व रुग्णांना आवश्यक उपचार दिले जात असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

राज्यभर तपासणी सुरू असताना भिवंडीतील प्रकार

दरम्यान, राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेल, खाणावळी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी मोहीम सुरू आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. असे असतानाही भिवंडीत विषबाधेची घटना घडल्याने अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच कठोर इशारा दिला होता. परवाना निलंबित केल्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित आस्थापनाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता भिवंडीतील या घटनेनंतर संबंधित दुकानाची तपासणी आणि प्रशासनाकडून कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. शोरमामुळेच विषबाधा झाली का आणि त्यामागचे नेमके कारण काय, हे तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!