लोणी काळभोरमध्ये विजेचा लपंडाव; नागरिक हैराण, शेतकरी बेजार! वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणे बिघडण्याची भीती; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

लोणी काळभोर, ता. १० : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर महावितरण उपविभागांतर्गत गेल्या आठ दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे विद्युत उपकरणांच्या बिघाडाचा धोका वाढला असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीज बंद ठेवली जात असल्याने घरगुती कामांपासून ते व्यावसायिक व्यवहारांपर्यंत अनेक कामांवर परिणाम होत आहे. दुसरीकडे, सध्या पावसाअभावी शेतीला पाणी देण्यासाठी कृषिपंपांचा वापर वाढला असून, वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येत असल्याच्या तसेच चुकीच्या बिलांच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात वारंवार चकरा मारूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. एखादे बिल थकीत राहिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तत्परतेने केली जाते; मात्र कथित वीजचोरीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.


लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरातील नागरिकांच्या या प्रश्नांवर ग्रामपंचायतींसह सत्ताधारी व विरोधी पक्षांतील पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करतात, असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
याबाबत लोणी काळभोरचे सहाय्यक अभियंता विक्रांत मोहोळ यांनी सांगितले की, ३० ते ४० वर्षांपूर्वीचे जुने आणि जीर्ण झालेले वीजवाहक कंडक्टर बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून काम करण्यात येत आहे. तसेच व्होल्टेज सुधारण्यासाठी उपकेंद्रात कॅपॅसिटर बँक बसविण्याचे काम सुरू आहे. या उपाययोजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
सध्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर कृषिपंप सुरू असल्याने वीजभार वाढला आहे. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठा सकाळी आणि संध्याकाळी ठरावीक वेळेस बंद ठेवावा लागतो. वाढलेल्या भारामुळे फुरसुंगी ते तरडे या वीजवाहिनीवर ठिकठिकाणी तार तुटणे आणि अन्य तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना घडतात. याशिवाय विविध विकासकामांसाठीही वेळोवेळी वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
मात्र, नागरिकांना वारंवार होणाऱ्या या त्रासातून दिलासा मिळण्यासाठी महावितरणने दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
