हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी बैलांची लोणी काळभोरमध्ये भव्य मिरवणूक! बैलपोळ्यानिमित्त सर्जा फॅन क्लबचा पुढाकार; डीजे-डॉल्बीच्या तालावर बैलांचे जल्लोषात स्वागत


लोणी काळभोर, ता. १० : पेडगाव येथील हिंदकेसरी तसेच सातारा जिल्ह्यातील कदमवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या बैलांची बैलपोळ्याचे औचित्य साधून लोणी काळभोरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्जा फॅन क्लबच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या तालावर बैलांचा जल्लोषात गौरव करण्यात आला.

श्रेयस वलटे यांच्या मालकीच्या सर्जा, आनंद, सुंदर व सैतान या बैलांनी विविध बैलगाडा शर्यतींच्या मैदानांत उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पेडगाव येथील हिंदकेसरी आणि कदमवाडी (सातारा) येथील महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत त्यांनी आपल्या शर्यतीतील कौशल्याची चुणूक दाखवून दिली. त्यामुळे या बैलांच्या मिरवणुकीबाबत परिसरातील बैलगाडा शौकिनांमध्ये विशेष उत्सुकता होती.

बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत बैलांना आकर्षक सजावट करण्यात आली होती. डीजे आणि डॉल्बीच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. आपल्या लाडक्या बैलांची कामगिरी पाहण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी लोणी काळभोरमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बैलपोळ्याच्या दिवशी कष्टकरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच पारंपरिक सणाचे औचित्य साधून स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या बैलांची मिरवणूक काढत त्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे बैलगाडा शर्यतींच्या शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मिरवणूकीचे नियोजन अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कुमार ढवळे, अक्षय अडागळे, साहिल पठाण, अक्षय ननवरे, तौफिक शेख, तेजस घुसाळकर, अखिल ननवरे, गौरव पवार, नयन ननवरे, ऋषिकेश पवार, आदित्य सुंबे, विकास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!