‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाअंतर्गत शिरूर तालुक्यात ३३ हजारावर लाभार्थ्यांना लाभ

पुणे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या शिबिरात शिरूर तालुक्यातील ३३ हजार २२३ लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सेवा व योजेनचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांच्या वारंवार बैठका घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरापासून शिबिराला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील सर्व ९ मंडलस्तरावर सर्वप्रथम शिबिरे घेण्यात आले. यावेळी या शिबिरात सर्व सबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या विभागाशी संबंधित सेवा व योजनांबाबत माहिती देण्यात आली.
विभागनिहाय देण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत शिबिरापूर्वीच प्रसिद्धी करण्यात आली. शिरूर नगरपालिकेद्वारे घंटागाडीमार्फतदेखील पत्रके वाटणे आणि ऑडिओ क्लिपद्वारे शिबिरे आणि योजनेची माहिती देण्यात आली.
विविध प्रकारचे दाखले, मतदार नोंदणी संदर्भातील सेवा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, नवीन शिधापत्रिका वाटप करणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे किंवा वाढवणे, आधार लिंक करणे, दुबार शिधापत्रिका देणे, प्राधान्य कुटुंब योजना किंवा अंत्योदय योजना यामध्ये पात्रतेनुसार लाभार्थींना सहभागी करून घेणे आदी महसूल संदर्भातील सेवा, पशुसंवर्धन विभागाचे लसीकरण व इतर योजनेचे लाभ देण्यात आले.
कृषि विभागामार्फत डीबीटीअंतर्गत विविध योजना, आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणीचे विविध शिबीरे, आभा कार्ड वाटप, ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान योजना लाभ, नगरपालिका मार्फत विविध सेवा, भुमिअभिलेख, निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, जलसंपदा व पाटबंधारे विभाग अशा विविध विभागांच्या योजनांचे लाभ एकाछताखाली देण्यात आले अशी माहितीदेखील श्रीमती किसवे देवकाते यांनी दिली आहे.