पाऊस आला रेsss! पुढील 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार..


पुणे : राज्यात सध्या परतीच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागांत मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगड, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली या भागांत आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

याशिवाय मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

बुधवारीही पावसाचा जोर कायम

उद्या, बुधवारीही राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती आणि भंडारा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

जळगाव, धुळे, पालघर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा परिणाम

दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेली हवामान प्रणाली अधिक तीव्र होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन द्रोणिका बनले आहे. ही प्रणाली पुढील काळात पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही प्रणाली पुढे अधिक तीव्र होऊन 23 सप्टेंबरच्या रात्री ते 24 सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान विशाखापट्टणम आणि गोपाळपूरदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला ओलांडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज

या हवामान प्रणालीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. IMDच्या सध्याच्या इशाऱ्यानुसार, 24 सप्टेंबरलाही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!