काळजी घ्या! महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढली, ‘इतक्या’ रुग्णांची झाली नोंद..

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काल (ता.25) राज्यात 43 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्या 209 वर पोहोचली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण 300 रुग्ण आढळले आहेत, त्यातील 80 टक्के म्हणजेच तब्बल 242 रुग्ण मे महिन्यात आढळले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.
तसेच राज्यातील 43 नव्या रुग्णांपैकी 35 मुंबईतील, तर 8 पुण्यातील आहेत. याशिवाय ठाणे, डोंबिवली, आणि इतर महानगरांमध्येही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे, एकट्या मुंबईत 248 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ती राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 83 टक्के आहे.
ठाणे जिल्ह्यात रविवारी 11 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एका डॉक्टरांचाही समावेश आहे. त्या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. याशिवाय एका गर्भवती महिला आणि डोंबिवलीतील एका रुग्णावरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सद्यस्थितीत राज्यात 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 87 रुग्ण बरे झाले असून, 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले की, सध्या आढळणाऱ्या नवीन व्हेरिएंटचा त्रास विशेषतः ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि ज्यांना फुफ्फुसांचे विकार आहेत, अशा रुग्णांना अधिक होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि श्वसन स्वच्छतेचे नियम पाळणे यासारख्या उपाययोजनांचा अवलंब करण्याची गरज असल्याचं आरोग्य विभाग स्पष्ट करत आहे. अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही नागरिकांना देण्यात आला आहे.