राष्ट्रवादी काँग्रेसच ठरलं! पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या कारभाऱ्यांचा अडीच वर्षांचा नव्हे तर, सव्वा- सव्वा वर्षाचा कार्यकाळ?

पुणे : सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली असून नव्या पदाधिकाऱ्यांकडे कारभार सोपवला जाणार आहे.या पुणे जिल्हा परिषदेचे नवीन पदाधिकारी निवडताना संबंधित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अडीच वर्षांचा नव्हे तर, सव्वा वर्षाचा कार्यकाळ देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची गटनेता निवडीसाठी पुणे येथे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांनी जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. या पदाधिकाऱ्यांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचाली सुरू झाल्या आहेत.
यानुसार नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांऐवजी सव्वा -सव्वा वर्षांचा करण्याचा पक्ष गांभिर्याने विचार करत असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नव्या खेळीमुळे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सव्वा वर्षाच्या इतक्या कमी कालावधीत विकासकामे कशी करता येणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित झेडपी सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे.

पुणे जिल्हा परिषदेत तब्बल चार वर्षाच्या खंडानंतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. अशातच आता अडीच वर्षाचा नव्हे तर सव्वा सव्वा वर्षाचा कार्यकाल दिला तर विकास कामांना गती कशी येणार.केवळ अनेकांना पदाधिकारी म्हणून संधी देण्यासाठी जिल्ह्यातील विकासकामांचा खेळखंडोबा व्हायला नको,अशी भीतीही या सदस्यांनी बोलून दाखवली आहे.

नवीन सदस्यांना जिल्हा परिषद समजून घेण्यासाठीच किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षाचा करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगताच, उपस्थित सदस्यांमध्ये आनंदाऐवजी मोठी अस्वस्थता आता निर्माण झाली आहे.