कर्जमाफी फसवीच नाही तर आजारी; आता माघार नाही… रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम, सरकारला सुनावलं काय?

पंढरपूर : सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याची आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी चर्चेचे निमंत्रण दिले असले तरी मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, माझा रक्तदाब व्यवस्थित आहे, मात्र शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सरकारने कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्या मागे घेतल्याशिवाय आमचे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही.

यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली. 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आज अजितदादा सत्तेत असते तर असा जीआर निघालाच नसता, असा दावा त्यांनी केला.

तसेच, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. “शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणाऱ्या मंत्र्यांशी आम्ही संवाद साधणार नाही. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही,” असे म्हणत त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
रोहित पवार यांनी सरकारला इशाराही दिला. आज अल्टिमेटम देणार नाही, पण उद्या सरकारला अल्टिमेटम दिला जाईल. शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फसवेपणा आता समजू लागला आहे. त्यामुळे भविष्यात काही घडल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना जो बैल दिला तो आजारी होता, त्याचप्रमाणे सरकारची कर्जमाफीही आजारी आहे,” अशी खरमरीत टीका करत त्यांनी सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पुनरुच्चार केला.