महाराष्ट्रभर नावाजलेला ‘द जत्रा पॅटर्न’ कार्यक्रम ठरणार प्रेक्षकांना पर्वणी ; माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळीकांचन येथे भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल …..


उरुळी कांचन: उरुळी कांचन गावचे माजी सरपंच मयुर कांचन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीची अन् मातीची गोष्ट सांगणाऱ्या ‘द जत्रा पॅटर्न’ या अत्यंत वेगळ्या व भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. 24) सायंकाळी ठीक सहा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावरील कलावती लॉन्स उरुळी कांचन येथे हा सोहळा रंगणार आहे. या भव्य आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक संदीप गव्हाणे, सागर कांचन व सौ. उत्कर्षाताई सागर कांचन यांनी केले आहे.

“माणूस शहरात जातो, बंगला बांधतो, परदेशात फिरतो… पण पावसाळ्याच्या सांजवेळी चहाचा पहिला घोट घेताना नकळत मन विचारतंच – ‘आपल्या गावात बी पाऊस पडत असल का?’ ही माणुसकी आणि आपुलकी जिथून येते, त्याच मातीची गोष्ट म्हणजे ‘द जत्रा पॅटर्न’! तसेच “या कार्यक्रमात आपल्याला विविध वास्तववादी उपक्रम पहायला मिळणार असून यामध्ये 25 कलाकारांचा स्वरचित आणि स्वलिखित गाण्यांनी नटलेला ‘द जत्रा पॅटर्न’ हा केवळ दोन तासांचा मनोरंजनाचा खेळ नसून महाराष्ट्राच्या मातीचा, परंपरेचा आणि माणसांच्या तुटत चाललेल्या नात्यांचा एक जिवंत दस्तावेज आहे.

संबळ आणि हलगीचा खणखणीत ठेका, पोतराजाची कडक लक्ष्मी, दोरीवर खेळणारा डोंबारी, भवानीचा गोंधळ, कृष्णाची बासरी आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा पोवाडा… या लोककलांचे नयनरम्य रूप प्रेक्षकांना थक्क करणारे ठरणार आहे. या कार्यक्रमात स्वतः ‘महाराष्ट्राची माती’ एक पात्र बनून प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहे.

सिमेंटच्या जंगलात आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेल्या आजच्या पिढीला आई-बापाच्या त्यागाची व नात्यांची किंमत पटवून देणारा हा प्रवास आहे. पोटाच्या खळगीसाठी दोरीवर आयुष्य तोलणारा डोंबारी आणि पाठीवर कोड्याचे घाव सोसणारा पोतराज बघताना कलाकारांच्या श्रीमंतीची जाणीव होते.

शहरातील धावपळीत आई-बापाचे फोन “नंतर बोलतो” म्हणून कट करणाऱ्या तरुण पिढीला आईच्या हाताच्या भाकरीची आठवण करून देणारा, मोबाईल नसलेल्या काळातील ते निखळ प्रेम आणि शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यासाठी भिडलेली मावळ्यांची तलवार प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाही.

पैसा नाही, माणसं आणि आठवणी मागे ठेवा..

“जत्रा ही फक्त देवाची नसते, देव तर कित्येक युगांपासून मंदिरात बसलाय. जत्रा भरते ती माणसाला माणूस भेटण्यासाठी आणि मनातील ‘माणूसपण’ जिवंत ठेवण्यासाठी. पैसा मागे ठेवून जाऊ नका, माणसं आणि आठवणी मागे ठेवून जा!” हाच मूलमंत्र हा कार्यक्रम देतो.

दरम्यान, मनोरंजनासोबतच डोळ्यात पाणी आणणारा, क्षणार्धात अंगावर काटा उभा करणारा आणि पावले थिरकवायला लावणारा हा ‘द जत्रा पॅटर्न’ अनुभवण्यासाठी उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांनी, महिलांनी व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक संदीप गव्हाणे, सागर कांचन व सौ. उत्कर्षाताई सागर कांचन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!