अज्ञात कारणावरून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, सोरतापवाडी येथे घडली घटना..

उरुळी कांचन : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका ३७ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३० ) सकाळी उघडकीस आली आहे.
अज्ञात कारणावरून विवाहित महिलेने राहत्या लोखंडी ॲगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. राणी सुनील शिंदे (वय.३७, रा. मुळा मुठा कालव्याशेजारी, सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ रा. केमघुटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, मुळा मुठा कालव्याशेजारी असलेल्या एका नर्सरीशेजारी सुनील शिंदे , त्यांची पत्नी राणी शिंदे हे त्यांच्या चार मुलींसह भाड्याने घेतलेल्या दोन खोल्यात राहतात. कालव्याशेजारी असलेल्या एका नर्सरीत राणी शिंदे या काम करीत होत्या. सुनील शिंदे हे सकाळी रिक्षा घेऊन लवकर निघून गेले होते.
तर शेजारी असलेल्या खोलीत त्यांच्या मुली या झोपल्या होत्या. सकाळी एक मुलगी उठली व शेजारी आई असलेल्या घराचा दरवाजा वाजवला. यावेळी घराला आतून कडी लावली होती. आईला आवाज दिला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
यावेळी खिडकीतून पाहणी केली असता राणी शिंदे यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी राणी शिंदे यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले.
दरम्यान, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राणी शिंदे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरु आहे.