गरमीने काढला घाम! पुढील काही दिवस कसं राहणार तापमान? जाणून घ्या…


मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानामुळे केवळ उष्माघाताचाच नव्हे, तर हृदयविकाराचा धोकाही बळावला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राज्याच्या विविध भागांत सूर्याचा प्रकोप वाढत असल्याने आपत्कालीन विभागाने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, कोकण भागात १५ ते १७ एप्रिल, मध्य महाराष्ट्रात १५ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहणार आहे.

विदर्भात हा प्रभाव सर्वाधिक म्हणजेच १९ एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गुरुवारी तापमानाचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, ही या हंगामातील सर्वोच्च नोंद ठरली आहे.

दरम्यान, वाढत्या उष्म्यामुळे दुपारी रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी ओआरएस द्रावण, लिंबू पाणी आणि साखरेचे पाणी सतत प्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बाहेर पडताना सुती, सैल कपडे वापरून डोक्याला टोपी किंवा छत्रीचा आधार घेणे बंधनकारक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८९ जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उच्च रक्तदाब वाढून हृदयावर ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर (Dr. Kailas Baviskar) यांनी सांगितले की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना या वातावरणात अधिक धोका असून त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!